भगवंता ,कोणी कसं वागावं आणि कोणी काय करावं याच उपजत ज्ञान मला दिलंस याबद्दल मी तुझा ऋणी आहे ,राजकारण ते क्रीडा अशा अनेक विषयात हे ज्ञान प्रदर्शन केल्यावर वेळ उरल्यास ,आणि तेव्हा मला तुझी आठवण आल्यास तुला शरण येतो . आपली विद्वत्ता अनेक विषयात दाखवल्याखेरीज मला चैन पडत नाही ,अध्यात्मात तर तुझ्या सर्वाधिक जवळ मीच आहे असा माझा नेहेमीच समज असतो . अनेक पदव्या मिळवून धनार्जन केले पण त्यातील अल्प स्वल्प पुण्यकर्मात खर्च करताना माझ्या मनाला वेदना होतात . पुढील पिढीची तरतूद करण्यात माझा उत्साह नेहेमी टिकून असतो . Gurudev Datta
यात्रा करताना सोयी पाहून त्यात सामील होतो ,त्या यात्रेत हवे नको पाहणाऱ्या मंडळींना सल्ले द्यायला मी विसरत नाही .अनेक तीर्थक्षेत्री यात्रा नेणाऱ्यांनी त्या अधिक मोबदला न घेता न्याव्यात हा माझा विचार असतो ,पण मी मात्र या विचाराने कधी कोणाला नेत नाही . भगवंता ,तुझे अनंत अवतार असताना मला दोन चार अवतारांची अत्यंत त्रोटक माहिती आहे पण याखेरीज अधिक काही माहिती व्हावी म्हणून मी प्रयत्न करत नाही, विषयसुखाची मात्र आणखीन माहिती व्हावी म्हणून माझी धडपड असते . Gurudev Datta
तुझ्या भक्तीपेक्षा तुझ्या अनुभूती ऐकायला मला आवडते आणि कमीत कमी सेवेत तुझी प्राप्ती कशी होईल या विचाराने मी प्रेरित असतो . भगवंता ,कष्ट दायक असे तुझे कठीण योगमार्ग मी सोपे करून ते अनुसरतो . अत्यंत उष्मा वाटल्याने मी या योगासाठी वातानुकूलित वर्गात शिक्षण सुरु केले आहे . त्याचे प्रमाणपत्र मला मिळणार आहे Gurudev Datta.
संन्यासी आणि साधू महाराज आले कि मी दर्शनार्थ अवश्य जातो मात्र ते समोर आलेल्या भक्तांविषयी काही बोलत नाहीत ना याची अगोदर माहिती घेतो . दर्शनाला गेलो असताना माझ्या बाबतीत कोणी असे भूत आणि वर्तमान कथन केल्यास या जगात सर्वात पापी मीच ठरेन .चारित्र्य हनन होईल या भीतीने पाप गुप्त रहावे हि माझी इच्छा असते . Gurudev Datta
अनेक भक्ती उपक्रमात मी सामील होतो पण तिथे सांगितलेल्या गोष्टी ह्या सुविचार वाचून जसे विसरतो तशा पटकन मनाच्या पटलावरून पुसल्या जातात .राजकारणावर भाष्य तर माझा जीव कि प्राण आहे ,दिवसभर मी माझ्या आवडत्या काहींची पाठराखण करतो आणि विरोधी मंडळींच्या मागील पिढ्यांचा उद्धार करतो . त्यामुळे इतरांना भेडसावत असणारा टाईमपास हा विषय माझ्याकडे नाही . भगवंता अशा प्रकारे दिवस कसा जातो हेच कळत नाही ,त्यामुळे वेळ कोणाला आहे ?? हे माझे सर्वाना नित्य सांगणे असते . Gurudev Datta
तुझ्याकडे काय मागावे ? वरच्या सर्वच गोष्टी माझ्याकरिता अतिआवश्यक आणि तू दिलेल्या असल्याने मी त्या करण्यात व्यस्त असतो , बाकी सर्व तर तू जाणतोसच . Gurudev Datta
*!!! श्रीगुरुदेव दत्त !!!*
0 Comments