*आत्म परीक्षण*
एक शिष्य एका अरण्यात तप करत होता.आज त्याच्या तपाला
बारा वर्ष पूर्ण झाली आणि गुरूने त्याला खूष होऊन एक आरसा भेट दिला आणि सांगितलं"
हा असा चमत्कारिक आरसा आहे की, हा आरसा तू ज्याच्या पुढे धरशील तुला त्याच्या मनातील
भाव, भावना, विचार सहज कळतील". शिष्य खूप खूष झाला आणि त्याने थोड्याच वेळात तो
आरसा ध्यानात बसलेल्या आपल्या गुरूच्या समोर धरला आणि काय? त्याला गुरूंच्या मनात तर
कपट, अहंकार, लोभ अश्या भावनांचं दर्शन घडलं. तो आश्चर्यचकित झाला आणि स्वतःच्या मनालाच
सांगू लागला "अरे!आपण ज्याला आपले गुरु मानले, ज्याला देवासमान पुजले, ज्याचा
प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याच्या प्रत्येक शब्दांवर आज पर्यंत मार्गक्रमण करत आलोत
त्या गुरूंच्या मनात कपट, अहंकार, लोभ कमाल आहे. त्याला वाईट वाटले आणि त्या गुरूंचा
त्याला रागही आला तो तडक तिथून निघाला.
थोडा पुढे आला आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला.
त्याला वाटेत अनेक लोक भेटली त्याने प्रत्येकाच्या पुढे आरसा धरला आणि प्रत्येक माणसाच्या
मनातील भावनांचे, विचारांचे त्याला दर्शन घडू लागले. काही लोक मनात द्वेष, ईर्षा, घृणा
घेऊन फिरत होती तर काही लोक कपट, वासना, अहंकार, तिरस्कार घेऊन फिरत होती तर काही स्वार्थ,
अप्रामाणिकपणा, क्रूरता घेऊन फिरत होती. बापरे!तो शिष्य खूपच निराश झाला आणि एका झाडाखाली
बसला आणि विचार करू लागला की, इतक्या मोठ्या गावात एकही चांगला माणूस मला न सापडावा
ही किती मोठी शोकांतिका आहे. मी किती चुकीच्या आणि वाईट लोकांच्या संगतीत राहत आहे.
खरच पूर्ण जग वाईट लोकांनी व्यापलेलं आहे. त्याला काय करावं काही सुचेना.
त्याच विचारात तो घरी पोहचला आणि त्याला वाटले माझे
बाबा ज्यांना मी देवतुल्य मानते ते तर बिलकुल वाईट असूच शकत नाही या समजुतीने त्याने
आरसा आपल्या वडिलांच्या समोर धरला आणि.... आणि... तो निराश झाला त्याला त्यांच्याही
मनात स्वार्थाचे, लोभाचे दर्शन घडले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आपल्या आईकडे वळवला.
तीच आई जी त्याच्यावर निःस्वार्थ, निर्व्याज, निर्मोही पणाने प्रेम करत होती त्याने
पटकन आरसा आपल्या आईसमोर धरला आणि तो पटकन खालीच बसला कारण त्याचा पुरता भ्रमनिरास
झाला. कारण त्याला आईच्या मनातही त्याला मोह, स्वार्थ दिसलाच.
सरते शेवटी तो आपल्या गुरुकडे वापस गेला आणि गुरूला
सांगू लागला की, "हा कसला समाज आणि कसले लोक मला एकही चांगला माणूस भेटलाच नाही.
संपूर्ण समाज मला कोणत्या ना कोणत्या दुर्गुणाने वेढलेला आहे अशा समाजात माझं कसं होईल
याच चिंतेत मी तुमच्या कडे परत आलोय".गुरु क्षणभर शांत राहीने, त्यांनी एक दीर्घ
सुस्कारा सोडला आणि त्याच्या कडे पाहत मिश्किल हसत बोलू लागले."मला वाटले बारा
वर्षाच्या तपानंतर तू सुविचारी आणि सदाचारी झाला असेल पण माझा अंदाज खोटा ठरला, अरे
वेड्या हा आरसा मी तुझ्या साठी दिला होता. तू या आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहावे
आणि स्वतःमध्ये जर काही अवगुण आढळले तर त्यात तू सुधारणा करावी हा माझा प्रामाणिक हेतू
होता पण तू दुसऱ्यांचे अवगुण पाहण्यात एवढा व्यस्त झाला की, तुला स्वतःला त्या आरश्यात
डोकावल्याचे भानच उरले नाही". शिष्य शांत झाला.गुरूंच्या चेहऱ्याकडे निर्विकार
पणे पाहू लागला. गुरु पुन्हा उद्गारले, *"दुसऱ्यांचे निरीक्षण करुन* *परीक्षण
नोंदवण्याचा भानगडीत* *तुला स्वतःचे आत्मपरीक्षण करायला सवडच* *मिळाली नाही* .अरे पाय
भाजत असतांना संपूर्ण पृथ्वीवर चामडी अंथरण्या पेक्षा आपल्या पायात आपण चप्पल घातलेली
बरी नव्हे का?" परिपूर्ण तर कोणीच नाही आणि तू परिपूर्णच्या शोधत राहून प्रत्येकाला
वाईटच समजू लागला.
एखादा माणूस असेलही वाईट पण तुला सगळीच वाईट दिसतात खऱ्या आत्मपरीक्षणाची
गरज तुला आहे" शिष्य निरूत्तर झाला आणि खाली मान घालून निघून गेला.
*तात्पर्य - प्रत्येक वेळी*
*दुसऱ्यांना* *दूषणं देत राहण्यापेक्षा कधी कधी* *स्वतःचाही अभ्यास
करायला हवा,* *आणि त्यासाठी आत्मपरिक्षण करणे जरूरीचे आहे.*
0 Comments