।।श्री दत्तात्रय स्वामी यांचे 3 अवतार।। Shri swami samarth jai jai swami samarth

 

।।श्री स्वामी समर्थ।।



*।।श्री दत्तात्रय स्वामी यांचे 3 अवतार।।*

 

१)श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज 

*२)श्री नृसिंह सरस्वती स्वामी* महाराज 

३)श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज 

 

दूसरा अवतार;

*।।श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज।।

 

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

 

    *अवतरण व बाल्यकाल*

 

            विदर्भातील कारंजा या गावी भगवान दत्तात्रेयांनी नृसिंह सरस्वती या नावाने कलियुगातील आपला दुसरा अवतार धारण केला.श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारात अंबिका नावाच्या ब्राह्मणीला दिलेल्या वचनानुसार त्यांनी अंबा व माधव या दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. त्यांच्या जन्मकाळी कोणत्याही ग्रहाचा अस्त नव्हता.सर्व ग्रह अनुकूल होते.सिध्दीपूर्वक संन्यासाचा संकेत देणाऱ्या प्रव्रज्या योगाने युक्त अशा शुभ मुहुर्तावर,उष्णता आणि थंडी यांचे साम्य असतांना,साधुजनांवर अनुग्रह करण्यासाठी भगवान दत्तप्रभु स्वतः प्रणवाचा उच्चार करीत अवतरले...



  

            बालपणीच त्यांनी आईवडीलांना आपले दोन चमत्कार दाखविले.आईला पुरेसे दूध येत नव्हते व ती त्यामुळे चिंतेत होती,त्यावेळी त्यांनी स्तनांना स्पर्श करताच आईचे दुध वाढले.तसेच आपल्या हाताच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने केले,पण तरीही या बालकाचा अधिकार त्यावेळी आई-वडील ओळखू शकले नाहीत.बाळ तीन वर्षांचे झाले तरी बोलत नाही ही चिंता आई-वडीलांना होती.तेव्हा मी मौजी बंधनानंतर बोलेन असे खुणेनेच त्यांची दाखविले म्हणून माधव भटजींनी आपल्या या पुत्राची मुंजच केली.मुंज होताच त्यांनी वेदपठण केले व ते आपल्या माता-पित्यास म्हणाले की,मी विरक्त आहे.या क्षणभंगुर देहाचा भरवसा नाही.तो पडण्यापुर्वीच ज्ञान झाले नाही तर मोक्ष मिळणार नाही.पुन्हा जन्म घ्यावा लागेल.त्यामुळे मी लगेच शास्त्राच्या आज्ञेनुसार श्रवणादिंच्या अनुष्ठानासाठी संन्यास घेत आहे.तरी मला अनुज्ञा द्यावी,पण मातेने अनुज्ञा दिली नाही...

 

        तेंव्हा श्रीनृसिंह सरस्वती आपल्या आईला म्हणाले की,माझ्या या उपक्रमाला अडसर होऊ नकोस तुला आणखी मुलगा होईल.माझ्या ध्यानाने तू हा भवसागर तरून जाशील.नंतर त्यांनी आपल्या मातेला आपले दिव्य परमेष्ठी रूप दाखविले ते रूप पाहिल्यावर मातेच्या पुर्वस्मृती जागृत झाल्या व ती माता त्यांना म्हणाली की, आपल्या उपक्रमाला मी विघ्न करीत नाही.माझ्या चित्तात हे आपले रूप स्थित व्हावे.तसेच आम्हाला पुत्र होईपर्यत आपण येथेच राहावे अशी माझी प्रार्थना आहे.या मातेच्या प्रार्थनेमुळे ते थांबले.पुढे या मातेने दोन छानशा बाळांना जन्म दिला.ती जुळी बाळे तीन महिन्यांची झाली.मग श्रीगुरु मातेला म्हणाले की,आता तुला दोन पुत्र झाले आहेत,पुढे आणखी दोन पुत्र आणि एक मुलगी होईल आणि तीस वर्षांनी मी पुन्हा तुला भेटेन.आधी दिलेल्या वचनाप्रमाणे मातेला अनुज्ञा द्यावी लागली...

 

 *।।तीर्थाटन।।*

 

           गाणगापूरात परान्नचा गोड घास मिळावा म्हणून तक्रार करण्याचा ब्राह्मणस्त्रीचा हा मोह श्रीगुरुनी दूर केला.भास्कर ब्राह्मणाची शुद्ध भक्ती पाहून त्याच्या जवळ असलेल्या अल्प अन्न-सामुग्रीतून चार हजार लोकांना अन्नदान घडविले.दिवाळीत एकाच वेळी वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या सात भक्तांच्या घरी श्रीगुरु राहिले.गंगा नावाच्या सतिला साठ वर्षांच्या वयानंतरही संतान प्राप्ती करून दिली.तंतुकाला श्रीशैल्याची यात्रा योगमार्गाने घडविली.नरहरी ब्राह्मणाचे कु्‌ष्ठ दूर केले.आपला भक्त असणाऱ्या शेतकऱ्याला शेतातले पीक कापून टाकायला सांगून अमाप पीकाचे धनी त्याला केले.पुर्व आयुष्यात कुरूगड्डी येथे रजक असलेल्या पण या जन्मात राजा झालेल्या भक्ताची पीडा दूर केली...

 

      त्या नंतर श्रीनृसिंह सरस्वती श्रीशैल्यपर्वतावर गेले व आता द्श्यमान स्वरूपात राहू नये असा विचार त्यांनी केला.सद्गुरूंच्या या लीलांमागे हाच हेतू होता की, स्नेहाने वा लोभाने कशीही प्रकारे लोकांनी आपली भक्ती करावी. आपल्या भजनावीना लोकांना मोक्षाची योग्यता येणार नाही,पण त्यांना तर भजनात अजिबात रस नाही.त्यामुळे त्यांच्या सांसारिक इच्छा पुरवून त्यांच्यातील प्रत्युपकाराची भावना जागवावी आणि अशारीतीने त्यांना आपल्या भक्तीला लावावे यासाठीच अशा विविध लीला भगवंतस्वरूपी श्रीगुरूंनी केलेल्या आहेत...

 

            आजही भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्रीगुरु प्रात:काली नरसोबाच्या वाडीला कृष्णा-पंचगंगा संगमावर स्नान करून भीमा अमरजा संगमावर आह्निक करून मठात भीक्षा स्विकारतात व तेथेच राहतात...

 

*।।औदुंबरा तळवटी नृसिंह योगी।कृष्णातटी परमशांत सुखास भोगी।ध्यानस्थ होवोनी समस्त चरित्र पाहे।अनन्य जो शरण,इच्छित देत आहे।।*

 

      श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज काशीला वास्तव्य करून होते.महाराजांचा नागेश मंदिरात वास होता.जवळच एक वेदपाठशाळा होती.त्यात अनेक बटु पाठाभ्यासात रत असत . एकदा अपरान्हकाळी बटुवर्ग काष्ठ समिधा आणण्यास गेला होता.जवळच भीमचंडी नावाचे निबिड अरण्य होते.काष्ठे गोळा करताना काळोख पडला.सर्व बटु अंधुक प्रकाशात वाट शोधत परतू लागले पण एक बटु मात्र रस्ता चुकला आणि गहन अशा वनात पोहोचला.त्यातच विजांचा कडकडाट आणि वृष्टी सुरु झाली...

 

         इतर सर्व बटु एकमेकांना हाका मारत आश्रमात पोहोचले पण हा बटु मात्र घोर अरण्यात अडकला.श्वापदांच्या गर्जना येऊ लागल्या,त्यात पाऊस जोराचा पडत होता,त्यात त्याला काही सुचेना,नदी पार करणे अशक्य होते तेव्हा आसरा म्हणून शेवटी नदीतीरी एका वृक्षावर चढला. रात्रीचे दोन याम भीतीने जागून काढले.निद्रेने व्याकुळ अशा त्याला उत्तररात्री झोप लागली. पहाटे झोपेत त्याचा तोल गेला आणि तो बटु नदीच्या वेगवान प्रवाहात पडला.आता जिवंत राहणे कठीण आहे याची त्याला कल्पना आली.पुढे वाहत जात असताना तो एके ठिकाणी अडकला.अडकलेली जागा म्हणजे अन्य काही नसून दोन चरण होते आणि ते प्रत्यक्ष नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांचे चरण होते.महाराज स्नानासाठी तिथे आले होते...

 

       महाराजांनी त्या बटुला वर ओढून घेतले आणि त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत आपल्या शिष्यांकडे सोपवले . महाराजांच्या तेजाने बटु पुरता भारावून गेला होता.दोन दिवस शिष्यानी त्या बटुची चोख व्यवस्था ठेवली.यामुळे तो पूर्ववत सावरला.चौकशी करून त्या बटुला शिष्यानी त्याच्या आश्रमात पोहोचते केले...

 


          त्या दिवसापासून तो बटु रोज महाराजांच्या दर्शनाला येऊ लागला.स्वामींचे चरण नौका आहेति खरोखरच या चरणरुपी नौकानी त्याला वाचवले होते. नित्य महाराजांच्या सेवेची ओढ वाटू लागली.कधी समिधा,कधी फुले आणणे आदी प्रकारे सेवा करीत असे एके दिवशी महाराज कुठेच दिसेनात तेव्हा अत्यंत दुःखाने तो चौकशी करू लागला . तेव्हा ते गंगा तटाक यात्रेला गेल्याचे समजले.मनातून खिन्न झाला तरीही गुरुमहाराजांना शोधण्यासाठी तो तटाक यात्रा करीत निघाला.फिरता फिरता प्रयाग क्षेत्री आला आणि तिथे त्याने गायत्री पुर:श्चरण आरंभले. पुन्हा श्रीचरण लाभावेत हा मनात संकल्प होता.गुरुमहाराजांना हा संकल्प ठाऊक होता आणि याच्या पूर्ततेसाठी महाराज त्याला भेटायला प्रयागला थांबले.महाराजांचे दर्शन झाले,अत्यानंद झाला...

        अहो महाराज या पामराला आपलेसे करा.महाराज हो म्हणाले.हा बटु म्हणजेच माधव सरस्वती...

 

*।।केवळ श्रीचरण दर्शने l देहभाना विसरला पूर्ण l क्षण एक श्रीचरणी सर्वस्व अर्पणे l दिनरात्रीचे भान नसे।।*

*।।श्रीचरणी सर्व स्वलीन l सर्वही विसरला देह गेह संपूर्ण l गुरुदेव सावध करिता वरांध्री महान l गडबडा लोळे चरणावरी।।*

 

        सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादात असलेला हा माधव चंद्रिका ग्रंथ म्हणजे माहितीचे एक नवीन दालन आहे.महाराजांच्या सर्व शिष्यांबद्दल अशीच माहिती अधिकाधिक संशोधनाने प्रकाशित होईल अशी आशा बाळगूया .श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य

 

।।अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू अवधूतचिंतन

 

भक्तवत्सल भक्ताभीमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।

 

*।।श्री स्वामी समर्थ।।

 

 


Post a Comment

0 Comments