गुरुमहाराजांनी आपल्या घरी येणे, Shree Gurudev Datta

 गुरुमहाराजांनी आपल्या घरी येणे


 प्रत्यक्ष गुरुमहाराजांनी आपल्या घरी येणे हे फार मोठे भाग्य आहे. अनेकांना हे भाग्य लाभले . सायंदेवाचे घरी ,शिरोळच्या ब्राह्मणा घरी ,अमरापूरच्या घेवड्याच्या वेला ठिकाणी ,गाणगापूरच्या महिषी दोहन घरी ,पुढे दीपावलीच्या दिवशी सात भक्तांघरी . जिथे जिथे महाराजांचा पदस्पर्श झाला त्या त्या स्थानाचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले . आजही या सर्व क्षेत्री महाराजांच्या दिव्य रूपाची नित्य पूजा अर्चा होते . Shree Gurudev Datta


पण मग या स्थानी वास करणारे लोक नृसिंहवाडी किंवा गाणगापूरसारख्या महाराजांच्या क्षेत्री जात नाहीत का ? अवश्य जातात . पद स्पर्शाने भूमीचा कण अन कण जरी तीर्थस्थानात परिवर्तित झाला असला तरी नृसिंहवाडी किंवा गाणगापूरचा स्थान महिमा नाकारता येत नाही . महाराज तिथेही आहेत आणि इथेही आहेत . अहो आपण अत्यंत भक्तिभावाने हाक मारल्यास ते आपल्या घरी देखील आहेतच कि, पण स्थान माहात्म्यामुळे नृसिंहवाडी सारख्या क्षेत्री जाणे अवश्य ठरते . या स्थान माहात्म्याच्या पुष्ट्यर्थ महाराजांनी तंतुकाचा अध्याय गुरुचरित्रात दिला आहे . गुरुमहाराज म्हणत आहेत ,मी गाणगापुरात आहे हे सत्य आहे पण त्याच बरोबर मी श्रीशैल्य क्षेत्रीदेखील आहे . आणि म्हणूनच या क्षेत्री तंतुकाला सर्वांची पूजा गुरुमहाराज स्वीकारत असल्याचे दिसले .पूजा करिता लिंगस्थानी l तेथे देखीले श्रीगुरूमुनी ll   Shree Gurudev Datta


आपल्या घरी नित्य दत्त महाराजांची पूजा होत असताना नृसिंहवाडीला कधी जावे ? अहो प्रत्येक क्षण प्रत्येक मुहूर्त त्यांच्या दर्शन ,पूजनार्थ उत्तम आहे . जन्मकाळी जावे ,सनकादिकांच्या तिथीला जावे , गुरुव्दादशी,गुरुपौर्णिमा आदी प्रसंगी जावे ,कृष्णावेणी उत्सवाला जावे , कधीही जावे . अन्य गावी असताना आपल्या आईवडिलांकडे जाताना सण वार तिथी मुहूर्त काही पाहतो का ? मग सर्व नात्यात महाराज असताना दिवस वार का पाहावा ? Shree Gurudev Datta


आपल्या भावना जितक्या उत्कट असतील त्या प्रमाणे महाराज अवश्य दर्शन देतात . सहाय्य करतात ,मार्गदर्शन करतात . दत्त माहात्म्यात एक ओवी आहे ,अनेक देह सुटले जरी l कल्पाचे कल्प लोटले तरी l जो जिवलगा अंतरी l आम्हा क्षणभरी न विसंबे ll कल्प हि कालमापनाची संज्ञा फार मोठी आहे . एका युगात जर इतके जन्म घेत असू तर अशा अनेक युगात आपले किती जन्म होत असतील ? पण कितीही देह धारण केले किंवा कितीही जन्म घेतले तरी दत्त महाराज आपल्या भक्तांना कधीही अंतर देत नाहीत . Shree Gurudev Datta

*!!! श्रीगुरुदेव दत्त !!!*



Post a Comment

0 Comments