श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज काशीला वास्तव्य करून होते




श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज काशीला वास्तव्य करून होते . महाराजांचा नागेश मंदिरात वास होता . जवळच एक वेदपाठशाळा होती . त्यात अनेक बटु पाठाभ्यासात रत असत . एकदा अपरान्हकाळी बटुवर्ग काष्ठ समिधा आणण्यास गेला होता . जवळच भीमचंडी नावाचे निबिड अरण्य होते . काष्ठे गोळा करताना काळोख पडला . सर्व बटु अंधुक प्रकाशात वाट शोधत परतू लागले पण एक बटु मात्र रस्ता चुकला आणि गहन अशा वनात पोहोचला . त्यातच विजांचा कडकडाट आणि वृष्टी सुरु झाली .  Shri nursinha sarasvat




इतर सर्व बटु एकमेकांना हाका मारत आश्रमात पोहोचले पण हा बटु मात्र घोर अरण्यात अडकला . श्वापदांच्या गर्जना येऊ लागल्या ,त्यात पाऊस . काही सुचेना . नदी पार करणे अशक्य होते तेव्हा आसरा म्हणून शेवटी नदीतीरी एका वृक्षावर चढला . रात्रीचे दोन याम भीतीने जागून काढले . निद्रेने व्याकुळ अशा त्याला उत्तररात्री झोप लागली . पहाटे झोपेत त्याचा तोल गेला आणि तो बटु नदीच्या वेगवान प्रवाहात पडला . आता जिवंत राहणे कठीण आहे याची त्याला कल्पना आली . पुढे वाहत जात असताना तो एके ठिकाणी अडकला . अडकलेली जागा म्हणजे अन्य काही नसून दोन चरण होते आणि ते प्रत्यक्ष नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांचे चरण होते .महाराज स्नानासाठी तिथे आले होते . महाराजांनी त्या बटुला वर ओढून घेतले आणि त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत आपल्या शिष्यांकडे सोपवले . महाराजांच्या तेजाने बटु पुरता भारावून गेला होता . दोन दिवस शिष्यानी त्या बटुची चोख व्यवस्था ठेवली . यामुळे तो पूर्ववत सावरला . चौकशी करून त्या बटुला शिष्यानी त्याच्या आश्रमात पोहोचते केले . 




त्या दिवसापासून तो बटु रोज महाराजांच्या दर्शनाला येऊ लागला . स्वामींचे चरण नौका आहेति l खरोखरच या चरणरुपी नौकानी त्याला वाचवले होते . नित्य महाराजांच्या सेवेची ओढ वाटू लागली .कधी समिधा ,कधी फुले आणणे आदी प्रकारे सेवा करीत असे एके दिवशी महाराज कुठेच दिसेनात तेव्हा अत्यंत दुःखाने तो चौकशी करू लागला . तेव्हा ते गंगा तटाक यात्रेला गेल्याचे समजले . मनातून खिन्न झाला तरीही गुरुमहाराजांना शोधण्यासाठी तो तटाक यात्रा करीत निघाला . फिरता फिरता प्रयाग क्षेत्री आला आणि तिथे त्याने गायत्री पुर:श्चरण आरंभले . पुन्हा श्रीचरण लाभावेत हा मनात संकल्प होता .गुरुमहाराजांना हा संकल्प ठाऊक होता आणि यांच्या पूर्ततेसाठी महाराज त्याला भेटायला प्रयागला थांबले . महाराजांचे दर्शन झाले ,अत्यानंद झाला . अहो महाराज या पामराला आपलेसे करा . महाराज हो म्हणाले . हा बटु म्हणजेच माधव सरस्वती . Shri nursinha sarasvat

केवळ श्रीचरण दर्शने l देहभाना विसरला पूर्ण l क्षण एक श्रीचरणी सर्वस्व अर्पणे l दिनरात्रीचे भान नसे ll 

श्रीचरणी सर्व स्वलीन l सर्वही विसरला देह गेह संपूर्ण l गुरुदेव सावध करिता वरांध्री महान l गडबडा लोळे चरणावरी ll  Shri nursinha sarasvat


सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादात असलेला हा माधव चंद्रिका ग्रंथ म्हणजे माहितीचे एक नवीन दालन आहे . महाराजांच्या सर्व शिष्यांबद्दल अशीच माहिती अधिकाधिक संशोधनाने प्रकाशित होईल अशी आशा बाळगूया .श्री गुरुदेव दत्त !!!---Shri nursinha sarasvat

Post a Comment

0 Comments