श्री गुरुचरित्र अर्थ-अध्याय एकोणचाळीसावा वांझ स्त्रीला संतती

 !! श्री गणेशाय नमः !!

श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोधअध्याय एकोणचाळीसावा वांझ स्त्रीला संतती

श्री सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, चार हजार लोक जेवण्याच्या लीलेनंतर घडलेले आणखी एक वर्तमान तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक, आपस्तंब शाखेतील शौनक गोत्रात उत्पन्न झालेला सोमनाथ नावाचा ब्राम्हण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा असे होते. दोघेही आपआपल्या कर्मात पारंगत होते. ब्राम्हणाला वेदशास्त्र ज्ञात होते तर त्याची पत्नीही जाणकार व पतिव्रता होती. वयाला साठ वर्षे होऊनही तिला मुलबाळ झाले नव्हते. पतिसेवा परायण असूनसुद्धा नित्यनेमाने श्री गुरुदर्शनाला येत होती. याचबरोबर न चुकता निरांजन आणीत असे. Shri gurudev datta 

पतिसेवा हा मुख्य धर्म आहे, तो सोडून वरकड कितीही जप तप अनुष्ठाने केली तरी ती फोल असतात याचे ज्ञान तिला होते, आणि पुत्र प्राप्तीसाठी श्री गुरूंना निरांजन अर्पण करणे हा ही उत्तम उपाय आहे हे सुद्धा तिला माहित होते. हीच तिची शास्त्राची जाण. स्वधर्माचा परित्याग करून अथवा त्यात उणेपणा ठेवून, अतिपरिचयाने अवज्ञा करून, अश्रद्धेने करून इतर मार्गाने फलप्राप्ती होत नसते. हे तिला चांगलेच कळत असे. तिचा नित्यनेम पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व तिला म्हणाले, हे प्रतिव्रते नित्य निरांजन आणतेस तुझ्या मनात कशाची अभिलाषा आहे. सांग तो जगन्नियंता नारायण तुझी इच्छा गुरुप्रसादाच्या रूपाने पूर्ण करील. हे ऐकून त्या स्त्रीने साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाली देवा मी निपुत्रिक आहे. लोक निंदेला पात्र झाली आहे. Shri gurudev datta

ज्यांच्या घरी पुत्र नाही ते घर अघोर आहे. वंशात पुत्र व्हावा म्हणजे कुळांचा उद्धार होतो असे म्हणतात. हा भाग पुनर्जन्म, पूर्वजन्म किंवा कर्मविपाक सिद्धांत संबद्ध आहे. मृत्यूनंतर माणसास कर्मांतर संस्कार करावे लागतात. त्यामुळे तो मुक्त होऊन पर लोकात जातात. त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार उत्तम अथवा अधम-लोक त्यांना प्राप्त होतो आणि अशा रीतीने कर्मभोगाचे रक्षण होते. तत्पूर्वीचा कर्मांतर संस्कार श्राद्ध पक्ष हे विधी करणे गरजेचे असते आणि धर्मशास्त्राने हे करण्याचा अधिकार पुत्रास दिला आहे.म्हणून पुत्र व्हावा याबद्दल सर्वांनाच इच्छा असते. सध्या "मुलगा काय मुलगी काय" अशा विचारांचा जोरदार प्रचार चालू आहे. लोकसंख्या नियंत्रणाची ती एक क्लृप्ती आहे इतकेच! त्यामुळे सामाजिक पातळीवर काही एक परिणाम होणार असतील तरीही ते तात्कालिकच आहेत. कारण नियमन, नियंत्रण आपल्या हातात असले तरी उत्पत्ती, स्थिती, लय कुठे आपल्या हातात आहे. निसर्गचक्र आपल्या हातात घेतल्यामुळे आतापर्यंत मानवाला मोठमोठ्या अरिष्ठांनाच तोंड द्यावे लागले आहे. असो! त्या काळातील कल्पना, विचार, संस्कार जसे होते तद्नुरूप त्या स्त्रीने गुरूंना आपला मानस सांगितला आणि त्याच्या अभावी होणाऱ्या व्यथा, सामाजिक उपहासही सांगितला. तिची कळकळ श्रद्धा आणि सातत्य याचा विचार करून श्री गुरु तिला म्हणाले ठीक आहे. तुला कन्यापुत्र होतील. हे ऐकून तिने शकुन गाठ बांधली आणि हात जोडून म्हणाली, गुरुवरा मला साठ वर्षे झाली आहेत. शिवाय विटाळशीही होत नाही. यापूर्वी मी अनेक व्रते केली अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. अश्वत्थ प्रदक्षणा केल्या. तथापि काहीच उपयोग झाला नाही. आता नाही तर पुढच्या जन्मी तरी निपुत्रिक राहणार नाही असा आशेने अश्वत्थ सेवा केली.  Shri gurudev datta

स्वामी! याच जन्मात कन्यापुत्र होतील असा आशिर्वाद ऐकून मी धन्य झाले, मी माझ्या पदराला तशी खून गाठ बांधली आहे. आता तरी माझे हसे होऊ नये म्हणाले. अश्वत्थ सेवा विधान फार फलदायक आहे. त्याचे महात्म्यच सांगतो ऐक ! अश्वत्थाच्या मुळाशी ब्रम्हदेव, मध्यात ऋषिकेश आणि अग्रभागी रुद्र राहतात. इतर फांद्या - पाने यामध्ये ही इंद्र, आदित्य, गोब्राम्हण समस्त ऋषी, आणि मुळाकुरास नदी तीर्थ यांचा वास असतो अश्वत्थ हा ओंकाररुपीही आहे. त्याची पूजा अर्चा कशी करावी यांचे वर्णन केले नंतर अश्वथाखाली तिळाची रास घालावी. त्यावर पांढरे वस्त्र झाकावे. शक्तीनुसार सुवर्णाचा वृक्ष करावा व तो ब्राम्हणास दान करावा. यामुळे अपमृत्यू टळतो, मनकामनापूर्ण होतात. यानुसार तू ही आचरण कर. त्या विप्रस्त्रीने श्री गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे तीन दिवस केले, चौथ्या दिवशी तिला ऋतू प्राप्त झाला. सर्वांनाच आश्चर्य वाटले. तथापि, श्री गुरुकृपेने काहीही होणे अशक्य नसते. चौथ्या दिवशी त्या स्त्रीने शुचिर्भूत होऊन गुरुदर्शन घेतले, यथास्थिती पूजा केली. नमस्कार केला, व दोघे घरी आले. पाचव्या दिवशी ऋतू दिल्यामुळे कन्या झाली. दोघेही अत्यानंदाने श्री गुरूंची स्तुती करू लागले. त्या कन्येचे जातक ज्योतिषांनी वर्तविले. दहा दिवसानंतर ती बाळाला कडेवर घेऊन गुरुदर्शनास आली नमस्कार केला. त्या बालकाला आपल्याजवळ घेऊन श्री गुरु म्हणाले ही बहुपुत्रा होईल.

स्वतः शतायुषी होईल आणि नातवंडे वैगेरे अहेवपणीच डोळ्यांनी पाहील हीचा पती ज्ञानवंत होईल. चतुर्वेदी म्हणून त्याची ख्याती होईल. तुला दुसरा पुत्र होईल. तो मूर्ख आणि शतायुषी व्हावा अथवा विद्वान तीस वर्षे आयुष्य असलेला? तेव्हा ती म्हणाली अयोग्य शतायुषी पुत्र काय कामाचा योग्यच व्हावा त्याला पांच पुत्र व्हावे. त्याप्रमाणे तिला पुढे पुत्र झाला वेद शास्त्रवेत्ता झाला. त्याला पांच पुत्रही झाले. श्री गुरुमूर्तीनी त्या कन्येचे लक्षण सांगितले त्याप्रमाणे ती सरस्वतीकन्या तिचा पती यज्ञ करून दीक्षित नावाने ख्याती पावला. Shri gurudev datta

श्री गुरूंच्या कृपाशिर्वादाने साठ वर्षांच्या वांझेला कन्या व पुत्र झाले हा महिमा श्री गुरुभक्तीचा आहे. ज्यांच्या मनात दृढ निष्ठा असते त्यांना श्री गुरु कृपेचा लाभ मिळतच असतो. निष्ठेचे फळ मिळते त्यात अनमान करता कामा नये. हेच सुचविण्यासाठी एकोणचाळिसाव्या अध्यायात विप्रस्त्रीला पुत्रप्राप्त झाल्याची कथा तुला सांगितली असे सिद्ध नामधारकाला म्हणाले. इथे एकोणचाळी साव्या अध्याय समाप्त झाला.


II श्री दत्तात्रेयार्पणमस्तु II

!! श्री गुरूदेव दत्त !!

Post a Comment

0 Comments